या! दहशतवाद्यांनो, तुमचे स्वागत आहे.
सव्वाशे कोटींच्या या देशाची सतत वाढती लोकसंख्या कमी करण्यासाठीच जणू तुम्ही अभियान उघडले असावे -
असा संशय येण्याइतक्या नियमितपणे सुरू असलेले तुमचे बॉम्बस्फोट बघितले कि मन थक्क होते.
तुमच्या कर्तृत्वाला आमच्या देशात पूर्ण वाव आहे.
लक्षात ठेवा ... इथे लोकशाही आहे.
त्यामुळे तुम्हाला पोटा सारख्या कायद्याखाली पकडले तर 'विशिष्ट' समाजाची मने दुखावतील
याची इथल्या राज्यकर्त्यांना बालंबाल खात्री आहे.
त्यामुळेच पोटयाचा सोटा कधीचाच म्यान करून आमच्या देशाचे कर्तृत्वसंपन्न गृहमंत्री
तुमच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
अर्थातच त्यांचे लक्ष तुमच्यावर आहे. तुम्ही त्यांचे 'लक्ष्य' नव्हे!
त्यांचे लक्ष्य आहे ती मतपेटी आणि मुख्य म्हणजे त्यात पडणारी 'कथित' एक गठ्ठा मते!
सारांश काय, तर तुम्हाला घाबरण्याच काहीही कारण नाही.
या आणि निरपराध माणसांचे अगदी खुशाल बळी घ्या !
कस यायचं या देशात हा काय प्रश्न झाला?
बांगलादेशातून लाखो बांगलादेशी नागरिक इथे येतात, त्यांच्या सारखेच तुम्हीही या!
नेपाळातूनही तुम्ही सहजपणे बे-रोकटोक येऊ शकता.
ना कोणी पासपोर्ट विचारतील, ना कोणी व्हिसा !
हे विश्वचि माझे घर या आमच्याकडच्या संतवचनाचा अर्थ 'हे घर त्यांचेही विश्व' असा सुद्धा लावता येऊ शकतो.
समझौता एक्सप्रेस, मैत्री एक्सप्रेस, गळ्यात-गळा पॅसेंजर अशा अनेक गाडया इथे येतात.
एकदा का या भारतमातेच्या कडेखांद्यावर तुम्ही बसलात कि तुम्हाला कोणी रोकणार नाही.
कुठेही जा, कशीही झोपडी उभारा, रेशनकार्ड काढा, मतदार यादीत नाव नोंदवा,
आणि हे सर्व जमवत जमवत अस काही बस्तान बसवा कि तुम्हाला विरोध करण्याची कोणाची हिंमत होऊ नये !
सुप्रिम कोर्टाने आय.एम.डी.टी. कायदा रद्द करून बांगलादेशी नागरिकांच्या हकालपट्टीचा मार्ग मोकळा केलाय खरा,
पण कोण माईचा लाल तुम्हाला हाकलून देईल?
मायबाप मनमोहनसिंगांनी विलक्षण हुशारीने सुप्रिम कोर्टाचा आदेशच हाकलून लावला. तेव्हा सुखनैव रहा.
आता तर काय, रामविलास पासवान यांनी तुम्हाला चांदीच्या तबकातून नागरिकत्व देण्याचीच शिफारस केली आहे.
केवढे हे औदार्य! किती पराकोटीची तत्व निष्ठा! तेव्हा अजिबात संकोच करू नका.
या आणि निरपराध माणसांचे अगदी खुशाल बळी घ्या!
या भारतवर्षात मानवाधिकारांच्या रक्षणासाठी कटिबद्ध झालेले कित्येक महान विचारवंत आहेत.
ते तुम्हाला अगदी हवं ते देतील. अगदी रोज इच्छाभोजन सुद्धा घालतील.
तुमच्या कारवायांचा सुगावा लागल्यामुळे 'विशिष्ट' वस्तीत कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे असा नुसता फोन करा...
बघा मानवाधिकारवाल्यांची फौज तुमच्या मदतीला धावून येते कि नाही!
मुंबई पोलिसांना आणि इथल्या ए.टी.एस.ला मानवाधिकार कशाशी खातात हे तरी कळतं का?
त्यांनी तुम्हाला हात लावलाच तर मिडियातले मित्र देखिल तत्परतेने धावून येतील.
खूपच बोअर झाल्यानंतर निखळ मनोरंजनासाठी तुम्ही 'बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट' खेळता
आणि या नतद्रष्टांच्या पोटात दुखतं!
खरं तर त्यांनी तुमच्या प्रतिभेचं, धाडसाचं, कल्पकतेचं कौतुक नको का करायला?
केवढी तुमची विविधतापूर्ण शैली !
कधी रेल्वेत तर कधी रूग्णालयात, कधी कचरा-कुंडीत तर कधी स्कूटरमध्ये...
शिवाय त्यात एक भौगोलिक समानतेचं सूत्रही आहेच.
कर्नाटक असो वा काश्मिर, गुजरात असो वा गुवाहाटी... तुमचा खेळ सर्वत्र सुरूच!
आमचे गृहराज्यमंत्री श्री. प्रकाश जयस्वाल म्हणाले ते खरंच आहे
एवढया मोठया देशात इतक्या मोठया लोकसंख्येला वाचविण्याच्या कामात पोलिस पुरे पडणार तरी कसे?
तेव्हा पोलिस अपुरे आहेत, शस्त्रास्त्रे बोथट आहेत, कायदे शेळपट आहेत
आणि मुख्य म्हणजे निरपराध माणसांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली,
नुकसान भरपाई जाहीर केली कि दहशतवादाचा विषय इथे तेवढया पुरता संपतो.
तेव्हा खुशाल या... निरपराध माणसांचे जीव घ्या !
या देशात एक बरे आहे. इतरांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्यांना -
म्हणजेच पोलिसांना - इथे फारसे मानवाधिकार वगैरे नसतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment